नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक रविवारी थायलंडची राजधानी बँकॉक येथे पार पडली. चार तास चाललेल्या या बैठकीत उभय देशांनी दहशतवाद आणि जम्मू काश्मीरसह विविध मुद्यावर चर्चा करीत रचनात्मक संवाद सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवली.पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी समकक्ष नवाज शरीफ यांच्यातील संक्षिप्त भेटीच्या केवळ सहा दिवसानंतर दोन्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाल्याने ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीर जंजुआ यांच्यात सुमारे चार तास चर्चा चालली. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि पाकिस्तानी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी हेही यावेळी उपस्थित होती. बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केले. भारत-पाक पंतप्रधानांमध्ये पॅरिसमध्ये झालेली चर्चा पुढे नेत बँकॉकमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली. अतिशय रचनात्मक वातावरणात ही बैठक पार पडली. यावेळी नियंत्रण रेषेवरील शांतता याशिवाय दहशतवाद, जम्मू-काश्मीर व अन्य मुद्यांवर चर्चा झाली, असे यात म्हटले आहे.यापूर्वी गत २३ आॅगस्टला नवी दिल्लीत डोवाल आणि पाकचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्या बैठक होणार होती. मात्र पाकिस्तानी उच्चायोगाने हुरियत नेत्यांना दिलेल्या निमंत्रणावरून उभय देशांत तणाव निर्माण झाला होता आणि ही बैठक रद्द झाली होती. अजीज यांनी नवी दिल्लीत हुरियत नेत्यांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे भारताने स्पष्ट केले होते. यानंतर पाकने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठक रद्द केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारत-पाक सुरक्षा सल्लागारांची बैठक
By admin | Published: December 06, 2015 10:59 PM