नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या अस्थिर राजकीय परिस्थितीची राजधानीत चर्चा सुरू असताना बुधवारी काँग्रेसचे महासचिव व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे विश्वासू खा. अहमद पटेल यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मात्र या भेटीला अचानकपणे चढलेला राजकीय रंग मात्र लवकरच उतरला.
सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर आज खा. अहमद पटेल यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार काय? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर खासदार अहमद पटेल यांनी गडकरी यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. खा. अहमद पटेल यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले.