नवी दिल्ली: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची हॅट्ट्रिक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंडिया आघाडीमध्ये सहभागी असणाऱ्या पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. याबाबत काँग्रेस राज्य पातळीवर इतर पक्षांशी सातत्याने चर्चा करत आहे. याचदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते.
सदर भेटीबाबत काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर)वर माहिती दिली. आज आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव (संघटन) केसी वेणुगोपाल आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा उपस्थित होते.
इंडिया आघाडीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक
इंडिया आघाडीची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एख महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अनेक पक्षांचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. तर अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. बैठकीत जागावाटपाबरोबरच युतीसाठी समन्वयक नेमण्यावरही चर्चा झाली. याबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, या बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित होते. आपण एकत्र निवडणूक लढवू आणि जागावाटप लवकर व्हावे, अशी चर्चा झाली. खर्गे यांची भारत आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी सूचना काही नेत्यांनी केली. यालाही अनेकांनी सहमती दर्शवली, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
जागावाटपावरुन एकमत कठीण
दरम्यान, इंडिया आघाडीची आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण, इंडिया आघाडीला जागावाटप अंतिम करायचे आहे. तर काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती दररोज राज्यनिहाय जागावाटपावर चर्चा करत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने काँग्रेसला लोकसभेच्या ४२ जागांपैकी २ जागांची ऑफर दिली आहे. फक्त दोन जागा असल्यामुळे टीएमसीची या ऑफरसाठी तयारी नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते. दरम्यान, टीएमसीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, टीएमसी बंगालमध्ये काँग्रेसला ३ जागा देण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी टीएमसीला आसाममध्ये दोन आणि मेघालयमध्ये एक जागा द्यावी लागेल.