दिल्लीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक संपली; पहिली उमेदवार यादी येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:58 PM2024-03-20T17:58:54+5:302024-03-20T18:00:12+5:30
महाविकास आघाडीत कुणाला किती जागा यापेक्षा आमच्या सगळ्यांचे लक्ष्य भाजपाचा पराभव करणे हे आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं.
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील आमच्या जागांबाबत आज बैठकीत चर्चा झाली असून केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होईल. यात जागांवरील उमेदवार फायनल केले जातील. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील २ जागांवर आमची चर्चा झाली. उद्याच्या मुंबईतील बैठकीत पुन्हा चर्चा होईल. दक्षिण मध्य मुंबई जागेवर आमचा दावा आहे असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बैठकीनंतर केले.
नाना पटोले म्हणाले की, मुंबईत आम्हाला ३ जागा हव्या होत्या, परंतु २ जागांवर आम्ही समाधानी आहोत. मेरिटवर आम्हाला पुढे जायचे आहे. प्रिया दत्त आणि एकनाथ गायकवाड ज्या जागांवर निवडून आले. तिथे आमचा दावा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आघाडीतील कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढावं ही आमची भूमिका होती. त्यांनी काँग्रेस चिन्हावर लढायची इच्छा व्यक्त केली. ही जागा महाविकास आघाडीने मिळून निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडीत कुणाला किती जागा यापेक्षा आमच्या सगळ्यांचे लक्ष्य भाजपाचा पराभव करणे हे आहे. भाजपा घाबरलेली आहे. ज्यांनी भाजपावर प्रश्नचिन्ह उभे केले ते होते त्यांनाही ते सोबत घेतायेत. अजून खूप काही समोर यायचं आहे. आम्ही ४८ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार देणार आहोत. भाजपाला हरवायचे आहे. स्वत:ला ताकदवान म्हणवणारी पार्टी किती जणांना सोबत घेतेय हे पाहिले तर ते किती घाबरलेत हे दिसते असंही नाना पटोलेंनी म्हटलं.
दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा आहे. कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीत उभे राहणार आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. मात्र शाहू महाराजांनी पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं. गुरुवारी उद्धव ठाकरे हे कोल्हापूरात आहेत. त्याठिकाणी ते शाहू महाराजांची भेट घेणार असल्याचं बोलले जाते.