नवी दिल्ली - संसदेत केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला, त्यानंतर हे विधयेक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. आज या संयुक्त संसदीय समितीची बैठक झाली, त्यात मोठा राडा झाला आहे. भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि विरोधी खासदारांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी रागाच्या भरात पाण्याने भरलेली काचेची बाटली टेबलावर फोडली. या घटनेनंतर टीएमसी खासदाराला एक दिवसासाठी समितीतून निलंबित करण्यात आलं आहे.
समितीच्या आजच्या बैठकीत बॅनर्जी आणि भाजपा खासदार यांच्यात वाद रंगला. यावेळी बॅनर्जींनी हा प्रकार केला, त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. ज्यामुळे प्राथमिक उपचारासाठी त्यांना बाहेर नेण्यात आले. बैठकीतून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह हे त्यांना बाहेर घेऊन जाताना दिसले. भाजपा खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंगळवारी सेवानिवृत्त न्यायाधीश आणि वकिलांच्या एका गटाशी चर्चा करत होती. त्यावेळी या विधेयकाशी यांचं काय देणेघेणे असा आक्षेप विरोधी खासदारांनी घेतला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये वाद सुरू झाला.
नेमकं काय घडलं?
संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला. ज्यात रागाच्या भरात कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या टेबलाजवळ ठेवलेली काचेची पाण्याची बाटली जोरात आपटली. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. जेपीसीच्या आजच्या बैठकीत कायदेशीर बाजू मांडणारे काही मंडळी आली होती. त्यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी मला काही विचारायचं आहे असं म्हटलं तेव्हा अध्यक्षांनी तुम्ही याआधी खूप बोललात. आता नाही त्यानंतर खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला. त्यानंतर हा प्रकार घडला.
सोमवारीही झाला होता बैठकीत गोंधळ
वक्फ सुधारणा विधेयक २०२४ साठी बनवलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक सोमवारीही घेण्यात आली. त्यावेळीही असाच गोंधळ झाला. जिथे अल्पसंख्याक मंत्रालयाच्या प्रेजेंटेशनवेळी सत्ताधारी भाजपा, एनडीएचे खासदार आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. वर्षभरापूर्वीपर्यंत केंद्र सरकारला हे विधेयक आणण्याची गरज दिसत नव्हती, आता अचानक हे विधेयक आणण्यात आले आहे असं या बैठकीत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले.