संजय शर्मा -नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष सध्या पूर्णपणे निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येतील राममंदिर आणि लोकसभा निवडणुका या दोन्हींची तयारी पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत हरलेल्या १६० जागांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ‘अब की बार... ४०० पार’, ‘तीसरी बार... मोदी सरकार’ अशा निवडणुकीच्या घोषणा देत पक्षाने संपूर्ण पक्षसंघटनेला निवडणुकीच्या तयारीला लावले आहे. अयोध्येतील राममंदिराचा कार्यक्रम आणि लोकसभा निवडणुका या दोन्हींसाठी भाजपने एकाच वेळी तयारी केली आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत राममंदिराचा फायदा मिळण्याची शक्यता आहे; त्यामुळे अयोध्येच्या राममंदिराच्या माध्यमातूनच निवडणूक जिंकण्याचा मार्ग शोधण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अशी आहे तयारी...पक्षाचे चार प्रमुख नेते गेल्या निवडणुकीत गमावलेल्या १६० जागांवर निवडणूक रॅलींचा मॅरेथॉन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर या १६० जागांवर या चार नेत्यांच्या मॅरेथॉन निवडणूक सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या तीन ते चार जागांचे गट करण्यात आले असून प्रत्येक गटात या चार नेत्यांपैकी एकाची निवडणूक रॅली होणार आहे.
विजयाचा मार्गही अयोध्येतूनच...२५ जानेवारी ते २५ मार्च या काळात देशातील भाविकांना अयोध्या येथील राममंदिरात नेण्याची तयारी आणि लोकसभा निवडणुकीची तयारी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्हींच्या एकत्रित तयारीचा भाजपला फायदा होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. तर लोकसभा निवडणुकीत विजयाचा मार्गही अयोध्येतूनच जाईल, असा विश्वास पक्षाला आहे.