पतीला महिन्यातून दोन विकेंड भेटते, पुरेसे नाहीय का? सुरतच्या महिलेची उच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 12:35 PM2023-12-17T12:35:38+5:302023-12-17T12:36:27+5:30
सूरतचे हे प्रकरण आहे. पतीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम ९ नुसार आपल्या पत्नीला रोज सोबत राहण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी कौटुंबीक न्यायालयाकडे केली आहे.
अहमदाबाद: गुजरातच्या उच्च न्यायालयात एक चवीने चर्चिली जाईल अशी केस आली आहे. एका नोकरदार महिलेने हायकोर्टात धाव घेतली आहे. महिन्यातून दोन विकेंड पतीला भेटायला जाणे वैवाहिक दायित्व पुर्ण करण्यासारखे नाहीय का, असा सवाल या महिलेने विचारला आहे. एपतीने कौटुंबीक न्यायालयात खटला दाखल केल्याने या महिलेने हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
सूरतचे हे प्रकरण आहे. पतीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम ९ नुसार आपल्या पत्नीला रोज सोबत राहण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी कौटुंबीक न्यायालयाकडे केली आहे. त्याची पत्नी मुलाच्या जन्मानंतरही कामाच्या बहाण्याने तिच्या आई-वडिलांकडेच राहत आहे. ती फक्त दुसरा आणि चौथा विकेंड पतीला भेटायला येते. यामुळे ती लग्नाच्या जबाबदाऱ्यांची उपेक्षा करत आहे. याचा परिणाम लहान मुलाच्या तब्येतीवरही झाला आहे, असा दावा पतीने कोर्टात केला आहे.
या खटल्यावर पत्नीने आक्षेप नोंदविला आहे. यामध्ये महिन्यातून दोनवेळा मी पतीच्या घरी जाते. यामुळे पतीला सोडल्याच्या दाव्याला आव्हान देत आहे, असे म्हटले होते. परंतू, न्यायालयाने पूर्ण सुनावणीची गरज असल्याचे सांगून २५ सप्टेंबरला तिचा आक्षेप फेटाळून लावला होता. याविरोधात ही महिला आता उच्च न्यायालयात गेली आहे.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती व्ही.डी नानावटी यांनी या महिलेलाच प्रश्न विचारले आहेत. जर पती आपल्या पत्नीला एकत्र येऊन सोबत राहण्यास सांगत असेल तर त्यात चुकीचे काय आहे? त्याला खटला दाखल करण्याचा अधिकार नाहीय का? असे प्रश्न उपस्थित करत महिलेकडे २५ जानेवारीपर्यंत उत्तर मागितले आहे.