ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - संसदेचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या गोंधळामुळे वाहून जात असतानाच तिस-या आघाडीची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व भाजपा वगळून इतर पक्षांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी पवार यांच्या निवासस्थानी होणा-या या महत्वाच्या बैठकीकडे भाजप व काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
या बैठकीसाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव, आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच इतर पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पवारांनी खास रणनिती आखत आयोजित केलेल्या या बैठकीतून काय निर्णय समोर येतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीही पवार यांनी अशाच प्रकारची बैठक घेतली होती.
दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही उद्याच पक्षाच्या सर्व खासदारांसाठी खास भोजन आयोजित केले आहे.