लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नक्षलवाद्यांचा प्रश्न कसा हाताळायचा यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराला तोंड देत असलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सोमवारी येथे होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी छत्तीसगढमधील सुकमा येथे भूमिगत नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २५ जवानांची हत्या केली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफचे नक्षलवादविरोधी मुख्यालय कोलकात्याहून छत्तीसगढला हलवण्यात आले आहे. गुप्त माहिती मिळवण्याचे मार्ग शोधणे, सध्या सुरू असलेल्या नक्षलवाद्यांविरोधीतील कारवायांचा आढावा घेणे, कोणत्या भागात प्रश्न जास्त आहे त्याचा शोध घेणे व सुरक्षादलांची कमीत कमी हानी होईल याचे उपाय या बैठकीत शोधले जातील, असे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी रविवारी सांगितले. या बैठकीला छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, तेलंगण, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले आहे. राजनाथसिंह अध्यक्षस्थानी असतील. दोन महिन्यांपूर्वी सीआरपीएफचे ३७ जवान छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी ठार मारले होते.एप्रिल २०१० मध्ये छत्तीसगढमधील दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ७६ जवानांची हत्या केली होती. गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, माओवाद्यांच्या ९० टक्के कारवाया या मर्यादित म्हणजे ३५ जिल्ह्यांत आहेत व त्यांचा प्रभाव मात्र दहा राज्यांतील ६८ जिल्ह्यांत आहे.
नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर आज दहा राज्यांची बैठक
By admin | Published: May 08, 2017 1:38 AM