नवी दिल्ली- देशात वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका होते आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आता पाऊलं उचलत आहे. केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदं भरणार आहे. रेल्वेतच सुमारे २ लाखाहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीची सुरुवात केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील २४४ कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे.
केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून या मेगाभरतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. कामगार मंत्रालय सध्या विविध खात्यांमध्ये असलेल्या रिक्त पदांची माहिती घेत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर नव्या योजनेचा योग्य आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक तत्वावर ही रिक्त पदं भरण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.
प्रशासनावर होणार खर्च कमी करण्यासाठी नोकर भरती थांबवली होती. त्यामुळे अनेक पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त आहेत. पण, आता येत्या काही महिन्यात हे चित्र बदलणार असल्याचं समोर येतं आहे. सध्या केंद्रीय मंत्रालय स्तरावरील ६ लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत. केंद्रीय पातळीवर ही योजना यशस्वी झाल्यास राज्य पातळीवरदेखील ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. यात सुमारे २० लाख युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयाकडून लवकरच सगळ्या मंत्रालंयांना आणि सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायजेसला यासंबंधी पत्र लिहून तेथिल रिक्त जागांची माहिती दिली जाणार आहे. यामुळे मोठ्या संख्येने तरूणांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.