पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेघालय दौऱ्यावर आहेत, यावेळी भाजपने मोठ्या रॅलीचे आयोजन केले. दरम्यान, पीएम मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “जेव्हा मी मेघालयचा विचार करतो, तेव्हा मला प्रतिभावान लोक, परंपरांचा, अद्भुत नैसर्गिक सौंदर्याचा विचार होतो. मेघालयचे संगीत जिवंत आहे. फुटबॉलची आवड आहे. मेघालयच्या प्रत्येक कोपऱ्यात सर्जनशीलता आहे, अस मेघालयचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली. 'देशाने नाकारलेले, निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक आजकाल जपमाळ घालतात आणि म्हणत आहेत की- मोदीजी, तुमची कबर खोदली जाईल, पण देश म्हणतोय, देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी, तुमचे कमळ फुलणार.
पीएम मोदी म्हणाले की, आज भारत यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे आणि मेघालय यामध्ये भक्कम योगदान देत आहे. ते पुढे घेऊन राज्यासाठी काम करायचे आहे. "मला सांगायला आनंद होत आहे की मेघालय आणि ईशान्येतील लोक कमल आणि भाजपसोबत आहेत."
'मेघालयला 'फॅमिली फर्स्ट' ऐवजी 'पीपल फर्स्ट' सरकारची गरज आहे. मेघालय घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त झाले पाहिजे. केवळ दिल्लीतच नाही तर मेघालयातही कौटुंबिक पक्षांनी आपली तिजोरी भरण्यासाठी मेघालयला एटीएम बनवले आहे, असा टोलाही मोदींनी लगावला.
पीएम मोदी म्हणाले, “मेघालयच्या हितांना कधीच प्राधान्य दिले नाही, तुम्ही छोट्या-छोट्या मुद्द्यांवर विभागले गेले. या राजकारणाने तुमचं खूप नुकसान केलंय. इथल्या तरुणांचं खूप नुकसान झालंय. आज मेघालयला फॅमिली फर्स्ट ऐवजी पीपल फर्स्ट असलेले सरकार हवे आहे. म्हणूनच आज 'कमळाचे फूल' हे मेघालयातील सामर्थ्य, शांतता आणि स्थिरतेचे समानार्थी शब्द बनले आहे, असंही मोदी म्हणाले.