शिलाँग : मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी कोनराड यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्यांना आरोग्याविषयी काळजी घेण्यास आणि गरज वाटल्यास कोरोना टेस्ट करण्याची विनंती कोनराड यांनी केले आहे.
"माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी घरी आयसोलेशनमध्ये आहे आणि सौम्य लक्षणे जाणवत आहेत. गेल्या पाच दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांना आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी विनंती करतो, तसेच, गरज वाटल्यास टेस्ट करून घ्यावी. सुरक्षित राहा," असे ट्विट कोरोनाची लागण झाल्यावर कोनराड यांनी केले आहे.
याआधी कोनराड संगमा यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री ए.एल. हेक आणि शहरी कामकाज मंत्री स्नेवाभालंग धार यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती. दरम्यान, मेघालयात कोरोनाचे आतापर्यंत 12,586 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 580 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. 11,883 लोक बरे झाले आहेत तर 123 जणांचा मृत्यू झाला आहे.