शिलाँग: गेल्या 15 वर्षांपासून मेघालयात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही राज्यातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. 60 जागांच्या मेघालय विधानसभेत सध्याच्या कलांनुसार काँग्रेस 23, अपक्ष 9, एनपीपी 13 आणि भाजपा सात जागांवर आघाडीवर आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास काँग्रेस उर्वरित संख्याबळाची जमवाजमव करून पुन्हा सत्तेत येईल, असे चित्र आहे. मात्र, भाजपाने आता या ठिकाणी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायला फासे टाकायला सुरुवात केली आहे. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यातही भाजपाच्या निकालानंतरच्या मॅनेजमेंटमुळे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे मेघालयमध्येही असाचा काही चमत्कार पाहायला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. हेमंत बिश्व शर्मा हे लवकरच मेघालयमध्ये जातील, असे राम माधव यांनी सांगितले. सध्या देशातील केवळ पाच घटक राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेस मेघालय कायम राखणार का, याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
Meghalaya Election Results 2018: मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष; पण भाजपाकडून फासे टाकायला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 1:12 PM