शिलाँग - भारतीय जनता पार्टीच्या आमदारांसह आपल्याला ३४ विधानसभा सदस्यांचा पाठिंबा असल्याचे पत्र मेघालयातील एनपीपी पक्षाचे नेते कॉनराड संगमा यांनी रविवारी (4 मार्च) मेघालयच्या राज्यपालांना दिले. त्रिशंकू विधानसभेमुळे मुख्यमंत्री कोण होणार या विचाराचे 'मेघ' त्यांच्या रविवारच्या निर्णयामुळे आता दूर होत आहेत. आता ते भाजपाच्या 'नेडा' आघाडीतील आणखी एक मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील. कॉनराड हे लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांचे पुत्र आहेत. पी. ए. संगमा यांच्या कुटुंबाद्वारे लढल्या जाणा-या तुरा लोकसभा मतदारसंघातून कॉनराडही निवडून गेले होते. सध्या त्यांची बहीण अगाथा तुरा येथून लोकसभेत प्रतिनिधित्त्व करतात. कॉनराड यांच्याबरोबर मुख्यमंत्रिपदासाठी अगाथा यांचे नावही चर्चेत होते. मात्र भाजपाचे नेडा समन्वयक हेमंतो बिस्वा सर्मा यांनी कॉनराड यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. त्यामुळे मेघालयला पहिली महिला मुख्यमंत्री या विधानसभेतून तरी मिळणार नाही. अगाथा यांनी यापूर्वी केंद्रात मंत्रिपद सांभाळले आहे.
२००८ साली कॉनराड पहिल्यांदा मेघालय विधानसभेत निवडून गेले. त्यांना ऊर्जा, अर्थ आणि पर्यटन या महत्वाच्या खात्यांची जबाबदारीही मिळाली. २००९ ते २०१३ त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळली. २०१६ साली पी.ए. संगमा यांचे निधन झाल्यानंतर तुरा लोकसभा मतदारसंघातून कॉनराड लोकसभेत गेले. कॉनराड हे पी. ए. संगमा फाऊंडेशनचे अध्यक्षही आहेत. पर्यावरणक्षेत्रासाठी त्यांनी मेघालयात विविध कामे केली आहेत. मेघालय क्रिकेट असोसिएशन आणि पी. ए. संगमा फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत.कॉनराड संगमा मुख्यमंत्री असलेल्या विधानसभेचं चित्र थोडंसं वेगळं असेल. ६० जागांमध्ये सर्वाधिक म्हणजे २१ जागा मिळवणारा काँग्रेस पक्ष विरोधी बाकांवर बसेल. संगमा यांच्या एनपीपीने १९ जागा मिळवल्या आहेत त्यांना यूडीपीचे ६, भाजपाचे २ आणि पीडीएफचे ४ असे सदस्यांचं कडबोळं घेऊन सत्ता चालवायची आहे. ईशान्य भारतामध्ये मणिपूरपाठोपाठ सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळाला असला तरीही काँग्रेसला सत्तेतून बाहेर ठेवण्याचा नेडाचा पर्यायाने हेमंतो बिस्वा सर्मा यांच्या निर्णयाचा विजय होणार आहे.