नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये ठिकठिकाणी पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. रॅलीचा मार्ग सोडून काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला. तर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. याच दरम्यान आता मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावर सरकार आणि शेतकरी यांनी मिळून तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.
जगातील कोणतंही आंदोलन दडपून किंवा चिरडून शांत करता येत नाही असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान मलिक यांनी आता आंदोलनाबाबत मोठं विधान केलं आहे. "मी स्वत: शेतकरी आंदोलनातून पुढे आलो आहे. म्हणून मी त्यांच्या समस्या समजू शकतो. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणं देशाच्या हिताचं आहे. शेतकऱ्यांची समस्या जाणून घ्यावी, असं माझं सरकारला आवाहन आहे. दोन्ही बाजूंनी जबाबदारीने चर्चेत सहभागी झालं पाहिजे" असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.
"बहुतेक शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. यामुळे सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आवाहन मी करतो. पण जगातील कोणतंही आंदोलन हे दडपून किंवा चिरडून शांत केले जाऊ शकत नाही" असं देखील मलिक यांनी म्हटलं आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी असलेले सत्यपाल मलिक सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी जम्मू-काश्मीर, गोवा, बिहार, ओडिशाचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. आमदार म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणारे मलिक लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. जनता दल आणि भाजपामधून ते राजकारणात सक्रिय होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
खळबळजनक! लाल किल्ल्यावरील घटनेनंतर 100 हून अधिक शेतकरी बेपत्ता; एनजीओचा धक्कादायक दावा
लाल किल्ल्यावरील घटनेनंतर 100 हून अधिक आंदोलक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर परेडनंतर जवळपास 100 हून अधिक आंदोलक शेतकरी बेपत्ता झाले आहेत. एका स्वयंसेवी संस्थेने हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर 18 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या 18 पैकी सात जण पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील आहेत. अटक झालेले शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्यासाठी 23 जानेवारी रोजी निघाले होते. पंजाब ह्यूमन राइट्स ऑर्गेनायजेशन नावाच्या एका एनजीओने हा दावा केला आहे. त्यांनी प्रजासत्ताक दिनासाठी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. यातील जवळपास 100 आंदोलक शेतकरी गायब झाले आहेत.