शिलाँग - मेघालयमधील कोळसा खाणीत गेल्या 36 दिवसांपासून अडकलेल्या 15 खाण कामगारांपैकी एका कामगाराचा मृतदेह सापडला आहे. नौदलाच्या जवानांनी गुरुवारी (17 जानेवारी) हा मृतदेह बाहेर काढला. खाणीत तब्बल 200 फूट खोल खाली गेल्यानंतर जवानांना हा मृतदेह सापडला आहे. इतर 14 खाण कामगारांचा शोध घेण्यात येत आहे.
मेघालयमधील जैंतिया हिल्स जिल्ह्यात कोळशाच्या खाणींमध्ये 13 डिसेंबर रोजी 15 खाण कामगार अडकून पडले. लियटीन नदीच्या जवळ ही खाण असल्याने नदीतील पाणी देखील या खाणीत गेले. एनडीआरएफ आणि नौदलाच्या पथकाला खाण कामगारांना शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या 36 दिवसांपासून एनडीआरएफ आणि नौदलाचे पथक दिवस रात्र मेहनत घेत आहे.
मेघालयमधील खाणीत अडकून पडलेल्या खाण कामगारांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने याआधी नाराजी व्यक्त केली होती. कोळशाच्या खाणीत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्यासाठी उचलण्यात आलेली पाऊले अपुरी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मेघालय सरकारला सांगितले होते. त्यानंतर आता 36 दिवसांनी मेघालयमधील खाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एका खाण कामगाराचा मृतदेह सापडला आहे.