शिलाँग- राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांचे स्थान काय आहे असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. मेघालयमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्यावेळेस केलेल्या भाषणात रा.स्व. संघात नेतृत्त्वाच्या विविध पदांवर किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी आज विचारला.मेघालयातील भाषणामध्ये भाजपा आणि संघावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "संघाच्या विचारप्रवाहाविरोधात आम्ही देशभर लढत आहोत. भाजपा आणि संघ देशभरात विशेषतः ईशान्य भारतामध्ये संस्कृती, भाषा आणि जिवनपद्धतीचे महत्त्व कमी करत आहेत." ईशान्य भारतातील लोकांना उद्देशून ते म्हणाले, "आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल, भाषा आणि संस्कृतीबद्दल अभिमान असला पाहिजे. तुमच्या संस्कृती आणि विचारपद्धतीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत."
दरम्यान काल (30 जानेवारी) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शिलाँग येथे दाखल झाले. यावेळी तब्बल 70 हजार रुपयांच्या किंमतीचं जॅकेट परिधान करुन राहुल गांधी पार्टीच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी उत्तराखंडातील निवडणूक प्रचारादरम्यान एक सभेमध्ये कुर्त्यांचा फाटलेले खिसा दाखवणा-या राहुल गांधी यांनी आता एवढं महागडं जॅकेट घातल्यानं भाजपानं त्यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले आहे. महागड्या जॅकेटवरुन भाजपानं राहुल गांधींवर ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. 'राहुल यांचं सुटा-बुटातील मेघालय सरकार भ्रष्टाचाराच्या आहारी गेले आहे. आमच्याकडे उत्तर मागण्याऐवजी काँग्रेस सरकारनं स्वतःचं रिपोर्ट कार्ड दिलं पाहिजे', असे ट्विट भाजपानं मंगळवारी केले आहे.