नवी दिल्ली : गुप्तचर यंत्रणांकडून अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केल्यानंतर यात्रेकरु आणि पर्यटकांना काश्मीरमध्ये थांबण्याचा कालावधी कमी करण्यास तसेच लवकरात लवकर परतीचा मार्ग स्वीकारण्यास सरकारने सांगितले आहे. याशिवाय, काश्मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणेच्या 280 अतिरिक्त तुकड्या(28 हजार जवान) तैनात केल्या आहेत. यावरुन येथील राजकीय वातावरण तापले आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये केंद्र सरकारकडून काही तरी मोठा प्लॅन करण्यात येत असल्याच्या संशय व्यक्त केला आहे. बारामुलामध्ये पत्रकारांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, 'जर भाजपाच्या प्रमुख नेत्यांची भाषणे ऐकली आणि खोऱ्यात केंद्रीय सुरक्षा दलाची तैनात पाहिली तर काश्मीरच्या कोणत्याही नागरिकांमध्ये शंका निर्माण होऊ शकते. केंद्रीय सुरक्षा दल हे राज्यातील पोलिसांची डोळेझाक करत आहे. हे सर्व पाहिले तर असे सूचित होते की काही तरी मोठा प्लॅन करण्यात येत आहे.'
(अमरनाथ यात्रा स्थगित, दहशतवादी हल्ल्याची शक्यता, भाविकांना परतीच्या सूचना)
याचबरोबर, ट्विटरवरुन मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपावर निशाना साधला आहे. त्या म्हणाल्या, 'तुम्ही (केंद्र सरकार) एकमेव मुस्लिमबहुल राज्याचे प्रेम जिंकण्यास अयशस्वी झाला आहात. ज्याने धार्मिक आधारावर विभाजन रद्द करत धर्मनिरपेक्ष भारताला निवडले. आता काही गोष्टी बदलल्या आहेत आणि भारताने लोकांवर प्रांत निवडला आहे.' याशिवाय, दुसऱ्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, 'अर्थव्यवस्था ढासळत आहे. मात्र, मला आशा आहे की नेहमीप्रमाणे काश्मीरचा वापर मुख्य मुद्द्यांना बाजूला सारण्यासाठी होणार नाही.'
दुसरीकडे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही काश्मीर खोऱ्यातील अतिरिक्त जवान आणि सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी अडव्हायजरीवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच, काश्मीरमधील सर्व विरोधी पक्षांनी तात्काळ बैठक बोलविली आहे.