नवी दिल्ली : मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री पदासाठी सर्वसहमतीने पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या नेत्या आणि सईद यांच्या कन्या मेहबुबा मुफ्ती यांचे नाव समोर आले असून राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना प्राप्त होण्याची शक्यता आहे.पीडीपीचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा सदस्य मुजफ्फर हुसेन बेग यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना आमच्या पक्षात मेहबुबा यांना मुख्यमंत्री बनविण्यावर एकमत असल्याचे सांगितले. दुसरीकडे सरकारमध्ये भागीदार असलेल्या भारतीय जनता पार्टीनेसुद्धा या मुद्यावर पीडीपीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असे स्पष्ट केल्याने मेहबुबा यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ जानेवारीपासून सुरू होत असल्याने शोक बाजूला सारून मेहबुबा यांना त्यापूर्वी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे लागेल. दोन मुलींची आई असलेल्या ५६ वर्षीय मेहबुबा या पीडीपीच्या अध्यक्ष आहेत. त्या जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील.