Mehbooba Mufti : इस्रायली लष्कराने काल लेबनॉनमधील बेरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह याचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यांनंतर लेबनॉनमधील लाखो लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी इस्त्रायली हल्ल्यात लेबनॉन आणि गाझामध्ये ठार करण्यात आलेल्या लोकांना आणि विशेषत: हसन नसराल्लाह याला शहीद म्हटले आहे.
सध्या जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहे. अशा परिस्थित हसन नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर मेहबूबा मुफ्ती उद्या आपल्या सर्व निवडणूक प्रचार सभा रद्द केल्याची घोषणा केली आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, लेबनॉन आणि गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांसोबत, विशेषत: हसन नसराल्लाह याच्या मृत्यूबद्दल एकजुटता दर्शविण्यासाठी मी उद्या (रविवार) माझा निवडणूक प्रचार सभा रद्द करत आहे. आम्ही या दु:खाच्या आणि प्रतिकाराच्या काळात पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांच्या पाठिशी आहोत.
ओआयसीनं बोलावली बैठक दरम्यान, इराणने लेबनॉन आणि पॅलेस्टाईनमधील इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) च्या सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. शुक्रवारी ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना, इराणचे उप परराष्ट्र मंत्री (कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी) काझेम घरिबादी यांनी पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी इस्लामिक देशांमधील ऐक्य आणि एकता या विषयावर जोर दिला.
कोण होता हसन नसरल्लाह?सय्यद हसन नसरल्लाहचा जन्म ३१ ऑगस्ट १९६० रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतच्या उत्तरेकडील बुर्ज हमौद येथे झाला होता. १९९२ मध्ये हसन नसराल्लाहला हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनवण्यात आले. इराणच्या पाठिंब्याने हसन नसराल्लाहने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटना अतिशय मजबूत आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली होती. दरम्यान, हिजबुल्लाहचे इस्रायलशी असलेले शत्रुत्व नवीन नाही, उलट हिजबुल्लाहची स्थापनाच इस्रायलविरोधात होती. हसन नसराल्लाह हा १९७५ मध्ये लेबनॉनमधील गृहयुद्धात सक्रिय झाला होता. तो इस्रायलच्या लेबनीज भूभागाच्या विरोधात होता. तेव्हापासून त्याचे इस्रायलशी जास्त वैर निर्माण झाले होते. हसन नसराल्लाह पूर्वी शिया मिलिशिया संघटनेचा सदस्य होता. नंतर हिजबुल्लाहमध्ये सामील झाला. १९९२ मध्ये हिजबुल्ला प्रमुख सय्यद अब्बास मुसावीची हत्या झाली. त्यानंतर हसन नसराल्लाह हा हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनला.