श्रीनगर:अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यानंतर तालिबाननंअफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला अफगाणिस्तानातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, केंद्राला जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करुन 2019 मध्ये रद्द करण्यात आलेला राज्याचा विशेष दर्जा परत देण्याचा आग्रहदेखील केलाय. याशिवाय त्यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची अफगाणिस्तानसोबत तुलना केली आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्याचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्राला आमची परीक्षा न घेण्याचा इशारा दिला आणि केंद्र सरकारला "आमचे मार्ग सुधारणे, परिस्थिती समजून घेणे आणि आमच्या शेजारी काय चालले आहे ते पहा, असे म्हणाल्या. तसेच, 5 ऑगस्ट 2019 च्या निर्णयाचा उल्लेख करत 'महाशक्ती असलेल्या अमेरिकेला आपली पिशवी गुंडाळून पळून जावं लागलं. तुम्हाला (केंद्र) जम्मू-काश्मीरवर संवाद सुरू करण्याची संधी आहे,' असंही म्हणाल्या.
जम्मू-काश्मीर भाजपाचे अध्यक्ष रवींदर रैना यांनी मेहबूबा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हणाले की, त्या सध्या काही गैरसमजांखाली आहे. भारत एक शक्तिशाली देश आहे आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जो बिडेन यांच्यापेक्षा उलट आहेत. मग ते तालिबान असो किंवा अल कायदा, लष्कर, जेईएम किंवा हिजबुल, जो कोणी भारताविरुद्ध षडयंत्र रचेल त्याचा नाश होईल. "