जम्मू: केंद्रातील मोदी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीरमधील नेतेमंडळी सातत्याने भाजप आणि मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार केवळ हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचे काम करत आहे. त्यांचा हा एकच कारखाना काम करतोय, अशी घणाघाती टीका मेहबुबा मुफ्ती यांनी केली.
येत्या काही महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका, बेरोजगारी, हिंदू-मुस्लीम दंगली यावरून मेहबुबा मुफ्ती केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी त्रिपुरा, नंतर उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रात सुरूवात केली. कारण, जसजशी उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ येत आहे, त्यांच्याकडे दुसरे काही दाखवण्यासाठी नाही. ते केवळ याच आधारावर मत मागतात, या शब्दांत मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
त्यांचा एकच कारखाना काम करतो
तरूणांची सर्वांत मोठी समस्या बेरोजगारी आहे. केंद्रातील मोदी सरकारकडे यावर काहीच उपाय नाही. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. मात्र त्यांच्याकडे यावर काहीच उत्तर नाही. त्यांचा एकच कारखाना काम करतो. हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचे, अशी टीका मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे.
दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अनंतनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाच्या परिवाराला भेटायला जाऊ नये यासाठी त्यांना कैद केले असल्याचा दावा पीडीपी नेत्याने केला होता.