ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. ४ - पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी काश्मीरमधील पीडीपीचे साथीदार असलेल्या भाजपाचे नेते राम माधव यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्लाही उपस्थित होते.
मेहबूबा मुफ्ती या देशातील दुस-या महिला मुस्लिम मुख्यमंत्री बनल्या आहेत. याआधी ६ डिसेंबर १९८० रोजी सईदा अन्वरा तायमूर यांना देशातील पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला होता. त्या ३० जून १९८१ पर्यंत आसामच्या मुख्यमंत्रिपदी होत्या.
मेहबूबा मुफ्ती यांच्यासह आघाडीचे १६ कॅबिनेट व ८ राज्यमंत्र्यानी पदाची शपथ घेतली, त्यातील भाजपाच्या दोन मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन झाल्यानंतर राज्याची धुरा सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ याप्रकरणी भाजपा-पीडीपीत चर्चा सुरू होती. अखेर मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असा निर्णय घेण्यात आला.
Governor N.N. Vohra administers oath of office and secrecy to Mehbooba Mufti, who will be the 13th CM of the state. pic.twitter.com/3EHaicQLZy— ANI (@ANI_news) April 4, 2016