ठळक मुद्देमेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.संघ ही धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची महाराणी आहे आणि हे ट्वीट चंद्रावरून करत आहे अशा शब्दात मुफ्तींनी संघाला खोचक टोला लगावला आहे. सी. विद्यासागर राव यांनी एका कार्यक्रमात संघ धर्मनिरपेक्ष संघटना असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची महाराणी आहे आणि हे ट्वीट चंद्रावरून करत आहे अशा शब्दात मुफ्तींनी संघाला खोचक टोला लगावला आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी (5 फेब्रुवारी) एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्ष संघटना असून सर्वसमावेशक संघटना असल्याचे म्हटले होते. तसेच या संघटनेने लोकांना आपल्या आस्था, श्रद्धांचे पालन करण्याच्या व्यक्तीगत अधिकाराचा कायम सन्मान केल्याचे म्हटले होते. यावर मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीटरवरून टीका केली आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी याआधी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ काश्मीरसाठी एक प्रकारे सुवर्ण काळ ठरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी तोच वारसा पुढे चालवतील, अशी काश्मिरी जनतेची अपेक्षा होती. मात्र, मोदी काश्मीरप्रश्नी सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. तसेच राफेल प्रकरणी भाजपा, समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहली. तसा संयम त्यांनी राम मंदिर निकालाबाबत दाखवावा. न्यायालयाकडे बोट दाखवत टीका करू नये, असे मुफ्ती म्हणाल्या होत्या.