ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ७ - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनामुळे राज्याचे व पक्षाचे मोठे नुकसान झाले असून आता राज्याची सूत्रे मुफ्ती यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांच्या हातात सोपवण्यात येण्याचीशक्यता आहे. ५६ वर्षीय मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे संकेत आहेत. काश्मीरमधील पीडीपीचा साथीदार भाजपानेही मेहबूबा यांच्या नियुक्तीस विरोध करणार नसल्याचे संकेत दिल्याने मुफ्ती यांची मुख्यमंत्रीपदी लवकरच बिनविरोध नियुक्ती होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मेहबूबा मुफ्ती या जम्मू- काश्मीरच्या पहिल्या मुख्यमंत्री ठरतील.
सत्ता हस्तांतरण हा पीडीपीचा अंतर्गत निर्णय असून मुफ्ती यांच्या नियुक्तीला भाजपाचा विरोध नसेल' असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे आरोग्यमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते चौधरी लाल सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्यामुळे भाजपाला मेहबूबा यांची नियुक्ती मान्य असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमोक्रॉटीक पार्टीने सर्वाधिक २८ जागा जिंकल्या तर २५ जागा जिंकत भारतीय जनता पक्ष दुस-या क्रमांकावर होता. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी युती करत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले आणि मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र काही दिवसांपासू मुफ्ती मोहम्मद सईद यांची प्रकृती बिघडली व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हापासूनच जम्मू-काश्मीरचे नेतृत्व कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. आणि अखेर आज (गुरूवार) सकाळी मुफ्ती मोहम्मद सईद यांचे दु:खद निधन झाल्याने त्यांच्या जागी आता त्यांची कन्या मेहबूबा यांच्याकडेच पक्ष व राज्याचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान मेहबूबा यांच्या नियुक्तीला अंतर्गत आव्हान मिळण्याची शक्यता आहे. पीडीपीचे वरिष्ठ नेते मुझफ्फर हुसेन बेग व तारिक हमीद कर्रा यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षात राहूननच पक्षविरोधी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांच्यासमोर बेग व कर्रा यांचे आव्हान असू शकते.