पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणांना हवा असलेला आरोपी मेहुल चोकसी काही दिवसांपूर्वी अँटिग्वामधून पसार झाला होता. त्यानंतर आता मेहूल चोकसी याने बेल्जियममधील अँटवर्प येथे पत्नीसोबत आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार त्याने बेल्जियममधील रेसिडेन्सी कार्ड मिळवलं आहे. दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांनी त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बेल्जियम सरकारला विनंती केली आहे.
मेहूल चोकसी याच्या सध्याच्या निवासस्थानाबाबत येत असलेल्या बातम्यांना भारतीय अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. मेहूल चोकसी हा भारतातील १३ हजार ५०० कोटी रुपयांच्यां पंजाब नॅशनल बँक घोटाळ्या प्रकरणी वाँटेड आहे. तो आधी अँटिग्वामध्ये लपून बसला होता. नंतर त्याने बेल्जियममध्ये आश्रय घेतला आहे. मेहूल चोकसी याची पत्नी प्रीती चोकसी ही बेल्जियमची नागरिक आहे.
मेहूल चोकसी हा त्याची पत्नी प्रीती चोकसी हिच्यासोबत बेल्जियममधील अँटवर्प येथे एफ रेसिडेन्सी कार्ड मिळवून राहत आहे. हे रेसिडेन्सी कार्ड मिळवण्यासाठी आणि भारताकडे होणाऱ्या प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी त्याने बेल्जियमच्या प्रशासनाला बनावट कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता मेहूल चोकसी हा स्वित्झर्लंडमध्ये जाण्याची योजना आखत असून, तिथे तो एका प्रसिद्ध कॅन्सर रुग्णालयात उपचारांच्या बहण्याने आश्रय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.