नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती आपल्या कुटुंबासह भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ट्रम्प सर्वप्रथम अहमदाबाद येथे जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात ट्रम्प यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. तर ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला मेलानिया ट्रम्प दिल्लीतील शाळेमधील हॅप्पीनेस कार्यक्रमाला भेट देणार आहेत. मात्र या कार्यक्रमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांचे नाव हटविण्यात आले आहे.
मेलानिया ट्रम्प 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील शाळेतील हॅप्पीनेस क्लासमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. परंतु, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमातून अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांना वगळण्यात आले आहे. याआधी दोन्ही नेते मेलानिया यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. ही शाळा दिल्ली सरकारच्या अंतर्गत येते. केंद्र सरकारच्या दबावामुळेच उभय नेत्यांचे नाव वगळण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने कऱण्यात आला आहे.
अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानंतर ट्रम्प कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी आगरा येथे दाखल होणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण तयारी केली आहे. यावेळी मोदी देखील सोबत राहतील असं वृत्त आले आहे. मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.