नवी दिल्ली - भाजपा सदस्यता अभियानात राज्य आणि नेत्यांकडून होणाऱ्या उदासीनतेमुळे पक्ष नेतृत्व नाराज आहे. पहिल्या टप्प्यातील सदस्यता अभियान ३ सप्टेंबरला सुरू झालं होतं, ते २५ सप्टेंबरला संपले. भाजपाने या २३ दिवसांत जवळपास ६ कोटी सदस्य बनवले जे अपेक्षेपेक्षा खूप कमी आहेत. पक्षाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीला २५ सप्टेंबरला १ कोटी नवीन सदस्य जोडण्याचं टार्गेट ठेवण्यात आले, मात्र ते पूर्ण झाले नाहीत. पक्षाच्या नेत्यांनी जोर लावूनही २५ सप्टेंबरपर्यंत ८३ लाख सदस्य बनवले, जे टार्गेटपेक्षा १७ लाखांनी कमी आहेत.
सदस्यता अभियानात सुमार कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, बिहारसारख्या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील नेत्यांना सदस्यता अभियानात आकडे सुधारण्यास सांगितले आहे. बिहारमध्ये ३२ लाख, राजस्थानात २६ लाख सदस्य बनले आहेत तर तेलंगणात हा आकडा १० लाखांहून कमी आहे. या राज्यांनी सदस्य बनवण्यासाठी दिलेल्या टार्गेटमध्ये ५० टक्केही पूर्ण केले नाहीत. २५ सप्टेंबरला भाजपा सदस्यता अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ६ कोटी सदस्य आकड्यात केवळ ४ राज्यांत निम्म्याहून अधिक सदस्य बनले आहेत.
टार्गेट अपूर्ण, नेतृत्व नाराज
यूपी, गुजरात, मध्य प्रदेश आणि आसाम या राज्यांनी ३ कोटीहून अधिक सदस्य बनवले आहेत. त्यात दीड कोटीहून अधिक सदस्य एकट्या उत्तर प्रदेशातून बनले आहेत. यूपीला २ कोटी सदस्य अभियानाचे टार्गेट होते. ज्यात त्यांनी ६५ टक्के यश मिळवले. दुसऱ्या नंबरवर गुजरात आणि मध्य प्रदेश आहे. या दोन्ही राज्यांनी मिळून १ कोटीहून अधिक सदस्य बनवले. गुजरात आणि मध्य प्रदेशने दिलेल्या टार्गेटच्या ७५ टक्के पूर्ण केलेत. तिसऱ्या क्रमांकावर आसाम असून त्याठिकाणी ५० लाखाहून अधिक सदस्य नोंदणी झाली आहे. आसामला ६५ लाख सदस्य नोंदणीचे टार्गेट दिले होते, दिलेल्या टार्गेटच्या ८५ टक्के आसामने पूर्ण केलेत.
छोट्या राज्यात सर्वात चांगली कामगिरी हिमाचल, अरुणाचल आणि त्रिपुरा यांची आहे. त्रिपुरा इथं १० लाखाहून अधिक सदस्य नोंदणी झाली. अरुणाचल प्रदेशात ६५ टक्के टार्गेट पूर्ण झालंय. हिमाचल प्रदेशात ७५ टक्के टार्गेट यशस्वी झाले आहे. उत्तराखंडमध्ये सदस्य नोंदणी अभियानात १० लाखांचा आकडा पार केला आहे. सदस्य नोंदणी अभियानात देशातील सर्व शहरांमध्ये दिल्ली नंबर वन आहे. दिल्लीत १४.५ लाख भाजपा सदस्य बनले आहेत.
दुसऱ्या सदस्य नोंदणी टप्प्यात विशेष लक्ष
आता दुसऱ्या टप्प्यातील सदस्य नोंदणी अभियानात भाजपा युवा मोर्चाकडे विशेष भर आहे. २७ सप्टेंबरला राष्ट्रीय युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात सदस्यता अभियानात पुढाकार घेण्यास सांगितले आहे. युवा मोर्चा कॉलेज, इन्स्टिट्यूटमध्ये विशेष मोहिम हाती घेत पक्षाला युवा कार्यकर्त्यांशी जोडण्याचा संकल्प घेतला आहे. ३५ वर्षापेक्षा कमी युवकांना भाजपा सदस्य नोंदणीत भाग घ्यायला सांगितला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि झारखंडसारख्या राज्यांना सदस्य नोंदणी अभियानापासून दूर ठेवले आहे.