नवी दिल्ली : संसद सदस्यांचा नाश्ता व भोजनाची ५२ वर्षांपासून व्यवस्था पाहणारी भारतीय रेल्वे पुढील महिन्यापासून या जबाबदारीतून मुक्त होत आहे. संसद सदस्यांना नवी संस्था नाश्ता व भोजन देईल. संसद सदस्यांना सध्या उत्तर रेल्वे नाश्ता व जेवण देत आहे. पार्लमेंट हाऊस इस्टेटमध्ये कँटीन्स, ॲनेक्स, वाचनालय इमारत आदी ठिकाणी उत्तर रेल्वे खाणपानाची व्यवस्था करते. लोकसभा सचिवालयाकडून उत्तर रेल्वेला पाठविण्यात आलेल्या पत्रात संसद परिसर १५ नोव्हेंबरपर्यंत रिक्त करून संगणक, प्रिंटर्स, फनिर्चर आदी सामग्री सुपूर्द करून सर्व कर्मचाऱ्यांना माघारी बोलावून घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. या घडामोडींना संसद आणि रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दुजोरा देत म्हटले की, अगदी ताज्या प्रस्तावानुसार अशोका हॉटेल चालवणारे इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन खाणपानाची व्यवस्था हाती घेण्याच्या तयारीत आहे.
संसद सदस्य, सभागृहांचे कर्मचारी, भेट देणाऱ्यांना कमी किमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी त्याला फार मोठे अनुदान दिले जाते. संसदेत खाणपानाची व्यवस्था सामान्यत: संसद सदस्यांची समिती पाहते. सध्याच्या लोकसभेसाठी समिती अजून स्थापन झालेली नाही. हा निर्णय सचिवालय प्रशासनाच्या पातळीवर अंतिम झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.
नव्या संसद इमारतीचे डिसेंबरमध्ये बांधकाम -- संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम येत्या डिसेंबरमध्ये सुरू होऊन ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे. संसदेचे अधिवेशन विद्यमान इमारतीत कोणताही अडथळा येऊ न देता घेता येईल यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली आहे, असे लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी म्हटले. - इमारत बांधकाम होताना हवा आणि आवाजाचे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती पावलेही उचलण्यात आली आहेत. - नव्या इमारतीत सर्व संसद सदस्यांना स्वतंत्र कार्यालय असेल व पेपरलेस कार्यालयांच्या दिशेने जाण्यासाठी ही कार्यालये अत्याधुनिक डिजिटल इंटरफेसेसयुक्त असतील.