लखनऊ : समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव या पिता-पुत्रातील दिलजमाई औटघटकेची ठरली असून, पक्षांतर्गत वैध-अवैधतेची तथा निलंबन-हकालपट्टीची दंगल पुन्हा सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच रविवारी रात्री पक्ष मुख्यालयासमोर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हातघाईवर आले होते. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हे अधिवेशनच मुलायम यांनी अवैध ठरविले. विनापरवानगी अधिवेशन घेणारे सपाचे महासचिव रामगोपाल यादव, पक्षाचे उपाध्यक्ष किरणमय नंदा आणि महासचिव नरेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रामगोपाल यादव यांनी बोलविलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांना सपाचे अध्यक्ष बनवून मुलायम सिंह यांना पक्षाचे सर्वोच्च नेते बनविण्याचा प्रस्तावही या वेळी मंजूर करण्यात आला. याच अधिवेशनात अमर सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली; शिवाय शिवपाल यादव यांनाही प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करून त्यांच्या जागी नरेश उत्तम पटेल यांचे नाव निश्चित करण्यात आले. मात्र, हे अधिवशेन अवैध असून, जे नेते आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुलायम सिंह यांनी दिला आहे. सर्व गैरसमज दूर करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन ५ जानेवारीला बोलविण्यात आले आहे. सपाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात आलेले शिवपाल सिंह यादव यांनी टिष्ट्वट करून मुलायम सिंह यांच्या हस्ताक्षरातील एक पत्र समोर आणले आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची परवानगी न घेताच बोलाविण्यात आलेल्या सपाच्या राष्ट्रीय संमेलनातील सर्व प्रस्ताव अवैध असल्याचे यात म्हटले आहे. या घडामोडीनंतर सपा पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे. या पत्रात म्हटले आहे की, या तथाकथित राष्ट्रीय अधिवेशनातील सर्व कार्यवाही अवैध आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याचा निषेध करण्यात आला. तर, अधिवेशनाचे कर्तेधर्ते रामगोपाल यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले. विना लेटरहेडच्या या पत्रात सपाप्रमुखांनी २८ डिसेंबरला जारी केलेल्या उमेदवारांच्या यादीचे समर्थन करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)नेताजींसाठी मी सर्वकाही करेननेताजींनी (मुलायम सिंह) मला सांगितले असते तर मी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदावरून स्वत:हून दूर झालो असतो. पक्ष किंवा नेताजींविरुद्ध काही कारस्थान शिजत असेल तर त्याविरुद्ध पावले उचलणे हे माझे कर्तव्य आहे. मी नेताजींचा मुलगा आहे व त्या नात्यात कोणी वितुष्ट आणू शकत नाही. नेताजी आणि पक्षाच्या रक्षणासाठी जे करावे लागेल ते सर्व मी करेन.- अखिलेश यादव, मुख्यमंत्री, उ.प्र. (कार्यकर्त्यांसमोर बोलताना)