नवी दिल्ली- व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाई क्वांग तीन दिवासंच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज भारत आणि व्हीएतनाम या दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये व्यापार, कृषी, अणुऊर्जा अशा विविध विषयांचा समावेश आहे. त्रान यांच्या भारतभेटीच्यावेळेस बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन होईल आणि सार्वभौमत्त्वाचा सन्मान राहिल अशा मुक्त, स्वतंत्र, भरभराटीस येणाऱ्या इंडो-पॅसिफिक प्रदेशाची निर्मिती करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील असे वक्तव्य केले आहे. चीनच्या या प्रदेशातील हातपाय पसरण्याच्या वृत्तीला ही मोठी चपराक म्हणावी लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्रान क्वांग यांची भेट झाल्यावर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनामध्ये भारताने व्हीएतनामची भारताच्या अॅक्ट इस्ट धोरणात महत्त्वाची भूमिका असून आग्नेय आशियांशी असलेल्या संबंधांमध्येही त्याचे महत्त्व मोठे आहे असे म्हटले आहे. तत्पुर्वी नरेंद्र मोदी आणि क्वांग यांनी दोन्ही देशांनी संरक्षण, पर्यटन, ऊर्जा, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषय या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष क्वांग यांची भेट घेतली असून तत्पुर्वी सकाळी क्वांग यांचे राष्ट्रपती भवन येथे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.क्वांग काल शुक्रवारी भारतात आले असून त्यांनी बिहारमध्ये बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगयालाही भेट दिली. आज संध्याकाळी ते भारत- व्हीएतनाम उद्योग फोरमला उपस्थित राहातील.