सुरेश भुसारीलोकमत न्यूज नेटवर्कद्रास (लडाख) : जवानांच्या अदम्य शौर्याची गाथा सांगणाऱ्या द्रास येथील कारगिल युद्धस्मारकाच्या संरक्षणार्थ जवानांसाठी उभारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मेमोरियल होमचे लोकार्पण मंगळवारी कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेकडो जवानांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कृतज्ञता उपक्रमाचे लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता, मेजर जनरल नागेंद्र सिंग, लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दिग्गजांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्याचा मान विजय दर्डा यांना देण्यात आला. सन १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात ५५९ शूरवीरांनी शौर्य दाखवीत मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान केले. या शौर्याची गाथा सांगणारी कारगिल वॉर मेमोरियलची उभारणी द्रास येथे करण्यात आली आहे. येथे दरवर्षी या शूरवीरांना नमन केले जाते. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. लोकमत फाऊंडेशनतर्फे कारगिल युद्धानंतर लोकवर्गणीतून विविध सामाजिक उपक्रम उभारण्यात आले. यात मंगळवारी लोकार्पण झालेल्या होमचाही समावेश आहे. कारगिल वॉर मेमोरियलचे संरक्षण करण्याच्या हेतूने या परिसरात राहणाऱ्या जवानांसाठी या होमची उभारणी करण्यात आली आहे.
लेफ्टनंट जनरल सेनगुप्ता यांनी केले कौतुकयावेळी लेफ्टनंट जनरल अरिंदर सेनगुप्ता यांनी ‘लोकमत’ परिवारातर्फे कारगिल वॉर मेमोरियलमध्ये उभारलेल्या या होम उपक्रमाचे कौतुक केले. या प्रकारची सामाजिक जाणीव ठेवून ‘लोकमत’ने उचललेले हे पाऊल अनेकांना प्रेरणादायी आहे. ‘लोकमत’ने कृतीतून सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली, याबद्दल त्यांनी ‘लोकमत’ परिवाराचे आभार मानले.
विजय दर्डा यांच्याप्रति व्यक्त केली कृतज्ञता‘लोकमत’ने द्रास येथे उभारलेल्या होमबद्दल १४ कोअर बटालियनचे प्रमुख अरिंदर सेनगुप्ता यांनी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा सन्मान केला. माजी खासदार विजय दर्डा यांनी लिहिलेल्या ‘पब्लिक इश्यूज बिफोर पार्लियामेंट’ पुस्तकाची प्रत लेफ्टनंट जनरल ए. सेनगुप्ता, कर्नल कमलदीप सिंग यांना भेट दिले. यावेळी जवानांना मिठाईचे वाटप करण्यात आले.