नवी दिल्ली - दारूमुळे अनेक संसार उद्धवस्त होतात. दारुमुळे किडनी खराब होवून मृत्यूही होण्याची शक्यता असते. मात्र, या बाबीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. कारण, प्रत्येक 20 व्यक्तींच्या मृत्युपैकी एक व्यक्ती दारूच्या सेवनामुळे होत असल्याचे संसोधनातून समोर आले आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेने याबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार जगभरात दरवर्षी दारूमुळे 30 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
जगभरात होणाऱ्या अपघात आणि एड्स रुग्णांच्या मृत्युपेक्षाही दारूमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे पुरुष वर्गासाठी ही धोक्याची घंटा आहे. दारू आणि आरोग्यावर संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या एका अहवालानुसार दारुसंबंधी माहिती समोर आली आहे. त्यानुसार, जगभरात दरवर्षी होणाऱ्या 20 मृत्युंपैकी 1 मृत्यू हा दारुमुळे होत आहे. त्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणे, दारु पिऊन हिंसा करणे, दारुमुळे आजारपण आणि संबंधित विकृतींमुळे होणाऱ्या मृतांचा समावेश आहे.
भारतात दारुमुळे दरवर्षी 2.6 लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामध्ये किडनीच्या समस्या, कॅन्सर, दारुच्या नशेतील अपघात या कारणांचा समावेश आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील ओरल कॅन्सर सर्जन डॉ. पंकज चतुर्वेदी यांच्यामते, 'आरोग्यातील बिघाड हा एक राज्यस्तरीय विषय आहे. कारण, अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. जर, महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी वयोमर्यादा 25 वर्षे आहे, तर गोव्यात काही ड्रिंक्ससाठी ही वयोमर्यादा 18 वर्षे आहे. ते म्हणाले, 'आता वेळ आली आहे की, देशभरात दारुच्या वापरावरील मानकांचे मानकीकरण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा बनणे गरजेचे आहे. त्यानंतरच, दारुमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत कमतरता येईल. दरम्यान, दारुमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये 3/4 हे पुरुष असल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहेत.