ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १७ - देशभरात बलात्कारसारख्या घटनांमध्ये वाढ होत असताना या घटना रोखण्यासाठी गुजरातमधील अध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांनी एक पर्याय सुचवला आहे. सत्संगमध्ये जाणा-या लोकांना ज्ञानाची प्राप्ती होते व त्यामुळे ते लैंगिक शोषणसारखे कृत्य करत नाही असा दावा मोरारी बापू यांनी केला आहे.
मोरारी बापू हे सध्या गोवा येथे प्रवचन देत असून नुकताच त्यांनी गोव्यातील प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. महिलांवरील अत्याचार कसे रोखता येतील असा प्रश्न मोरारी बापू यांना विचारला असता बापू म्हणाले, संत्संगमध्ये भाग घेतल्यास भारतातील बलात्काराच्या घटना कमी होऊ शकतील. सत्संगमध्ये भाग घेणारी लोकं कधीच बलात्कार करत नाही. सत्संग हा धार्मिक कार्यक्रम नसून अध्यात्मिक अनुभव आहे असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक मतदाराने त्यांच्या लोकप्रतिनिधींना संसदेत महिला आरक्षण का दिले जात नाही याचा जाबही विचारावा असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
मोरारी बापू यांच्या प्रमाणेच आसाराम बापूंनीही बलात्कार रोखण्यासाठी एक अजब सल्ला दिला होता. मुलींनी बलात्कार करणा-यांना भाऊ म्हणून हाक मारल्यास त्यांच्यावर बलात्कार होणार नाही असे आसाराम बापूंनी म्हटले होते, आणि विशेष म्हणजे हेच आसाराम बापू बलात्कार प्रकरणातील आरोपी म्हणून सध्या तुरुंगात आहेत.