पुरुषांची दारू, सेक्सची 'भूक' महिला अत्याचाराला कारणीभूत?- चेन्नई हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 06:19 PM2017-12-17T18:19:48+5:302017-12-17T18:20:23+5:30
मद्रास हायकोर्टानं महिलांवरील वाढत्या अत्याचाराची नेमकी कारण काय आहेत, याबाबतची माहिती केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारकडून मागवली आहे
चेन्नई - मद्रास हायकोर्टानं महिलांवरील वाढत्या अत्याचाराची नेमकी कारण काय आहेत, याबाबतची माहिती केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारकडून मागवली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलाचे कमी असलेले प्रमाण यासाठी कारणीभूत आहे का? की सांस्कृतिक, धार्मिक कारणांमुळे पुरुषांना शारीरिक संबध ठेवण्यापासून रोखलं जातं आणि त्यामुळे पुरूषांची सेक्स करण्याची भूक वाढत आहे, याचा शोध घेण्यास मद्रास हायकोर्टाने सांगितले आहे.
दारूची सवय बलात्कारांच्या घटनेसाठी जबाबदार आहे का? स्त्रीभ्रृण हत्या या घटनांसाठी कारणीभूत आहे का? प्रौढ शिक्षणाचा अभाव यासाठी कारणीभूत आहे का? याचाही शोध घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत न्यायालयानं १० जानेवारी २०१८ पर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोगाला उत्तर देण्यास सांगितलं आहे.
एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश किरुबाकरण यांनी म्हटलं की, निर्भया बलात्कार प्रकरणानंतर महिलांसंबंधीचे कायदे अधिक कडक करण्यात आले. मात्र तसं करूनही महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी झाल्या नाहीत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये मानसिक आणि सामाजिक दुष्टीकोन यांचा तपास करणे गरजेचं आहे. बलात्कारानंतर महिलेच्या आत्मसन्मानावर डाग लागतो. प्रत्येकाचा आपल्या शरीरावर अधिकार असतो आणि त्याचा अपमान कुणी करू शकत नाही, असंही न्यायाधीश किरुबाकरण म्हणाले.