महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळावी की नाही यावर काल संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर देत हा विचार फेटाळून लावला आहे. सरकार अशा कोणत्याही भरपगारी रजेचा विचार करत नसल्याचं इराणी यांनी सांगितलं आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या की, हा महिलांच्या जीवनाचा एक भाग असून याकडे आपण दिव्यांगत्व म्हणून पाहू नये. राज्यसभा खासदार मनोज कुमार झा यांनी संसदेत भरपगारी मासिक पाळी रजेबाबत प्रश्न विचारला होता. मनोज कुमार झा हे राष्ट्रीय जनता दलाचे खासदार आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधातील आक्रमकतेसाठी ओळखले जातात.
महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिलं जाईल असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. मात्र, मासिक पाळीसंदर्भातील स्वच्छतेच्या चर्चेचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. राष्ट्रीय स्तरावर तयार केलेल्या मसुद्याचाही त्यांनी उल्लेख केला. अनेक संबंधितांशी बोलून हा मसुदा तयार करण्यात आल्याचं इराणी यांनी सांगितलं. देशभरात मासिक पाळीबद्दल जागरुकता पसरवणे आणि स्वच्छतेशी संबंधित वस्तूंचा वापर वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे.
मासिक पाळीत भरपगारी रजा द्यायची की नाही यावरून बराच वाद सुरू आहे. स्पेनमध्ये महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या वेदना होत असताना सुट्टी दिली जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. असे करणारा स्पेन हा युरोपमधील पहिला देश ठरला आहे. पण भारतामध्ये सरकारचा तसा कोणताही हेतू सध्या तरी नाही. 8 डिसेंबर रोजी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी याबाबत प्रश्न विचारला असता, सरकारनेही तेच उत्तर दिलं होतं.