कोलकाता : ‘मी पूर्णपणे सामान्य’ आणि ‘स्थिर मनाचा’ आहे, असे सांगून कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.एस. कर्नन यांनी सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या तुकडीकडून मानसिक आरोग्य तपासणी करून घेण्याचा आदेश गुरुवारी नाकारला. न्यायालयाच्या बदनामीच्या खटल्यात कर्नन यांचा सर्वोच्च न्यायालयाशी सध्या संघर्ष सुरू आहे. मानसिक आरोग्याच्या सरकारी कलकत्ता पाव्हलोव्ह हॉस्पिटलमधील चार जणांच्या तुकडीसोबत सुमारे २० पोलीस कर्मचारी होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी निवासस्थानी भेट दिली व जवळपास दोन तास तेथे थांबल्यानंतर ते माघारी परतले. न्यायमूर्ती कर्नन यांनी डॉक्टरांना असेही सांगितले की, एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून घ्यायची असेल, तर त्याच्या पालकांची संमती आवश्यक असते आणि कोलकात्यात माझे कोणीही नाही.माझे कुटुंबीय येथे माझ्यासोबत उपस्थित नाहीत, तशी कोणतीही संमती नसल्यामुळे अशी कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जाऊ शकत नाही, असे कर्नन म्हणाले.कोलकात्यातील सरकारी रुग्णालयाने स्थापन केलेल्या डॉक्टरांच्या मंडळाकडून कर्नन यांची मानसिक आरोग्य तपासणी पोलिसांच्या साह्याने करून घ्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. कर्नन हे सर्वोच्च न्यायालयात हजर न राहिल्यामुळे व त्यांनी वृत्तपत्रांना जे सांगितले त्याचा भावार्थ लक्षात घेऊन हा आदेश देण्यात आला होता. मानसिक आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार देताना कर्नन यांनी डॉक्टरांना मी ‘पूर्णपणे सामान्य आणि स्थिर मनाचा’ आहे, असे लेखी दिले. याशिवाय माझे असे ठाम मत आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा दलित न्यायमूर्तीचा (म्हणजे त्यांचा स्वत:चा) अपमान करणारा व त्याचा छळ करणारा आहे, असे कर्नन यांनी वैद्यकीय मंडळाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मानसिक तपासणीचा आदेश धुडकावला
By admin | Published: May 05, 2017 1:29 AM