नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पदाचा राजीनामा दिला. निवडणुकीतील पराभवातून काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नाही. या पराभवाची कारणमिमांसा केली जात असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मांनी महत्त्वपूर्ण विधान केलं. राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आणि लष्कराला देण्यात आलेल्या विशेष अधिकारांमध्ये (अस्फ्पा) बदल करण्याचं आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यातून दिल्याचा फटका पक्षाला बसल्याचं शर्मा म्हणाले. काश्मीरमधील तैनात असलेल्या सैन्याच्या संख्येत कपात करण्याचं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून देण्यात आलं होतं. हा संदर्भ देत शर्मांनी बालाकोट एअर स्ट्राइकवर भाष्य केलं. 'पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपानं राष्ट्रवादाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. भाजपानं या मुद्द्याचं मोठ्या प्रमाणावर राजकीय भांडवल केलं. भाजपाच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. यासोबतच भाजपानं काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची तोडमोड केली आणि ते लोकांसमोर आणले,' असं शर्मा म्हणाले. निवडणूक निकालानंतर पक्ष संकटात सापडल्याची कबुली शर्मा यांनी एका मुलाखतीत दिली. 'काँग्रेस पक्ष संकटात आहे. कारण इतका मोठा पराभव होईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिला. मात्र हा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यामुळे अनिश्चिततेची परिस्थिती आहे. आता प्रामाणिकपणे पुढे जाण्याची आणि आत्परिक्षण करण्याची वेळ आली आहे. आम्ही नेमके कुठे चुकलो, याचं विश्लेषण व्हायला हवं. निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष संपणार नाही. त्यामुळे पक्ष संघटनेत नेमक्या काय त्रुटी आहेत, याचा शोध आवश्यक आहे,' अशा शब्दांमध्ये शर्मा यांनी पराभवानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं. निवडणूक जाहीरनाम्यातील तीन मुद्दे काँग्रेससाठी अडचणीचे ठरल्याचं ते म्हणाले. 'राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं, अफ्स्पा कायद्यात बदल करण्याचं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात होतं. विरोधकांनी हे मुद्दे लावून धरले. ते चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर मांडले गेले. याशिवाय काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांची संख्या कमी करण्याचं आश्वासनदेखील पक्षासाठी अडचणीचं ठरलं,' अशी कबुली शर्मा यांनी दिली.
...म्हणून काँग्रेसचा पराभव झाला; वरिष्ठ नेत्यानं सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 11:43 AM