मुंबई - देशभरात २२ जानेवारी अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामलला भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आणि जगभरातील भारतीयांनी जय श्रीराम म्हणत दिवाळी साजरी केली. युके, अमेरिकेसह जगभरातील विविध देशांत राम मंदिर सोहळ्याचा उत्सव दिसून आला. विशेष म्हणजे पाकिस्तानातील हिंदूंनीही ह्या सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज दानिश कनेरिया यानेही अयोध्येतील सोहळ्याचा आनंद साजरा केला आहे.
अयोध्येतील या दैदिप्यमान सोहळ्याला भारतातील अनेक सेलिब्रेटी या उपस्थित राहिले होते. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, वेंकटेश प्रसाद, रवींद्र जडेजा आदी क्रिकेटपटूंनी अयोध्येत हजेरी लावली होती. जगभरात या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा केला जात आहे आणि त्यावेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कानेरिया ( Danish Kaneria) यानेही आनंद व्यक्त केला. दानिश कानेरियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यात २२ जानेवारीचा सोहळा दिसत आहे.. त्याने व्हिडीओवर जय श्री राम असेही लिहिले होते. त्यानंतर, आता दानिश कनेरियाने अयोध्येतील रामललाच्या मूर्तीचा अलंकार आणि वस्त्रभूषण असलेला फोटो शेअर केला आहे.
मेरे राम... असे म्हणत दानिश कानेरियाने रामललाचा सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. लोभस, सात्विक, संदुर, मनमोहक रुप पाहून नेटीझन्सही मूर्तीच्या प्रेमात पडले होते. सोशल मीडियावर अनेकांनी फोटो शेअर करत रामललाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. तसेच, मूर्तीचं वर्णन करताना दाक्षिणात्या मूर्तींचा संदर्भही देण्यात आला. रामललाची ही मूर्ती सर्वांच्या पसंतीस उतरली असून अयोध्येत भाविकांनी दुसऱ्याचदिवशी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दानिशा कानेरियानेही मूर्तीचा वस्त्रभूषण अलंकारीत फोटो शेअर करत मेरे राम... असं म्हटलंय.
दानिशची अमेरिकेतील मंदिरात उपस्थिती
२२ जानेवारी रोजी दानिश हा अमेरिकेतील हॉस्टन येथील मंदिरात गेला होता आणि त्याच्यासोबत अनेक श्रद्धाळूही दिसत आहेत. या मंदिराच्या परिसरात रोषणाई केलेली पाहायला मिळतेय आणि फटाक्यांची आतषबाजी झालेली दिसतेय. दानिश व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज यानेही या सोहळ्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. केशव महाराज मैदानावर जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा जय सिया रामचं गाणं वाजवलं जातं.. त्याने व्हिडीओ पोस्ट करून म्हटले आहे की, सर्वांना नमस्कार... दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना आजच्या दिवसासाठी मी शुभेच्छा देतो. सर्वांना शांती, सौहार्द आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होवो. जय श्री राम