Farooq Abdullah Sing Bhajan: येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. रामललाच्या आगमनामुळे अवघा भारत देश राममय झाला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रामभक्त अनेक दशकांपासून वाट पाहत होते. यादरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांच्याशी या विषयावर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी राम भजने गायले.
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले की, प्रभू रामाच्या वडील दशरथांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला वचन दिले होते की, तुम्ही जे मागाल ते मी देईन. त्यांनी दशरथाकडे अयोध्येचे सिंहासन मागितले आणि राजा दशरथाने वचन पूर्ण करण्यासाठी सिंहासन दिले. रामाने याचा अजिबात विरोध केला नाही. यावेळी सिब्बल यांनी त्यांना राम भजन गाण्याचे आवाहन केले. यानंतर अब्दुल्लांनी 'मेरे राम, मेरे राम. किस गली गयो मेरे राम. आंगन मोरा सूना, सूना' हे भजन गायले.
ज्या दिवशी तुम्हाला धर्म...पाकिस्तानमध्ये मौलाना असरार होऊन गेले. त्यांच्याकडे कुराणवर सात भागांची पुस्तके आहेत. त्यांनी त्यांच्या पुस्तकात भगवान राम आणि बुद्धाबद्दल लिहिले आहे. महात्मा गांधी रामराज्याबद्दल बोलायचे. रामराज्य म्हणजे काय? यात सर्वजण समान आहेत. ज्या दिवशी तुम्हाला धर्म समजेल, त्या दिवशी तुम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही. आज आपण संघटित होऊन देश कसा वाचवायचा याचा विचार केला पाहिजे. आपण एकजूट होऊ शकलो नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले.
आम्ही देशासाठी त्याग केला आहेअब्दुल्ला पुढे म्हणाले, आम्ही या देशाचे नागरिक नाही का? आम्ही देशाविरुद्ध कोणते बंड केले? आम्ही देशासाठी बलिदान दिले आहे. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही भाष्य केले. त्यांनी दावा केला की, इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाचा प्रश्न सोडवला नाही, तर विरोधी आघाडी धोक्यात येईल. अब्दुल्ला म्हणाले की, ममता बॅनर्जींना गेल्या वेळी डाव्यांना जागा द्यायची नव्हती, पण आज त्या जागा द्यायला तयार आहेत. तुम्ही जिंकू शकता अशा जागांचा विचार करा, जिथे जिंकता येत नाही, तिथे जागा का मागताय?