लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांच्या नेतृत्वात असलेला लोकतांत्रिक जनता दल पक्ष दिल्लीत राष्ट्रीय जनता दलात (आरजेडी) रविवारी विलीन करण्यात आला. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तेजस्वी यादव म्हणाले, मोदी सरकारच्या विरोधात एकजूट होण्यास विरोधकांनी आधीच बराच उशिरा केला आहे. यापुढे विरोधकांनी एकत्र न येणे परवडणारे नसल्याचा सल्ला त्यांनी दिला.
बिहारमधून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ पार पडला. यावेळी खासदार प्रा. मनोजकुमार झा, खासदार मिसा भारती, आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, शरद यादव यांनी मंडल शिफारशींसाठी जो लढा दिला, तो देश विसरलेला नाही. भाजप व आरएसएसच्या विरोधात वैचारिक लढा द्यावयाचा असल्यास शरद यादव यांच्या मार्गदर्शनाचा निश्चित पक्षाला लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी सरकारच्या विरोधात २०१९ नंतरच विरोधकांनी एकत्र येऊन लढा देण्याची आवश्यकता होती. परंतु आता जर विरोधक एकत्र आले नाहीत तर बराच उशीर होईल, असा इशाराही तेजस्वी यादव यांनी दिला. यावेळी बोलताना शरद यादव म्हणाले, आयुष्याच्या या टप्प्यावर मला आता काहीही नको. तरुणांच्या हातात राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व देण्याची वेळ आली आहे. देशात तरुण नेत्यांमध्ये तेजस्वी यादव यांचे नेतृत्व आश्वासक आहे. अखिलेश यादव व तेजस्वी यादव यांच्यासारखे नेते या देशाला पर्यायी नेतृत्व देऊ शकतात, असेही शरद यादव यावेळी म्हणाले.