ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17 - लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणा-यांविरोधात केलेल्या वक्तव्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी समर्थन केलं आहे. लष्कर प्रत्येक काश्मीरी व्यक्तीला दहशतवादी समर्थक मानत नाही, पण जर कोणी लष्कराविरोधात काही करत असेल तर उपस्थित अधिकारी कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली आहे.
लष्कराच्या स्थानिक पातळीवरील कामात जर कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर, त्यावेळी कमांडिग ऑफिसरला निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार असतो. लष्कर प्रत्येक काश्मीरी व्यक्तीला दहशतवाद्यांचा समर्थक मानत नाही. पण जो दहशतवाद्यांच्या बाजूने आहे, तो दहशतवादीच आहे असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत.
याअगोदर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनीदेखील बिपीन रावत यांच्या वक्तव्याचं समर्थन करताना, 'दगडफेक करणारे आणि राष्ट्रहिताविरोधात काम करणा-यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे. कारण राष्ट्रहित सर्वात महत्वाचं आहे', असं म्हटलं होतं.
काश्मीर खो-यात दोन वेगवेगळ्या चकमकीत एका मेजरसहित चार जवान शहीद झाल्यानंतर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी वक्तव्य करत 'खो-यातील स्थानिक लोकांच्या शत्रुत्वाच्या वागण्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. तसंच सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान जवानांवर हल्ला करणा-यांवर सक्त पाऊल उचलंत देशविरोधी कारवाई केली जाईल', असं म्हटलं होतं. यानंतर काही राजकीय पक्षांनी बिपीन रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.