नवी दिल्ली - गेल्या महिन्यात प्रदूषणाने त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना आता गारठ्याने हैराण केले आहे. नवी दिल्लीतील थंडीने सोमवारी (30 डिसेंबर) तब्बल 119 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. दिवसाचे कमाल तापमान 9.4 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले, तर सोमवारी 2.6 अंश सेल्सिअस एवढ्या नीचांक तापमानाची नोंद झाली. दिल्ली धुक्यात हरवली आहे. तसेच दिल्लीतील दृश्यमानता शून्यावर आली आहे.
दिल्लीत काही ठिकाणी पारा शून्य अंशांवर गेल्याचे दिसून आले आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 100 टक्के असल्याने कडाक्याच्या गारठ्याचा सामना दिल्लीकरांना करावा लागत आहे. पुढचे काही दिवस पारा घसरलेलाच राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. थंडीमुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीच्या काही भागांतही शनिवारी सकाळी तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांनी निवारागृहांकडे धाव घेतली आहे. राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा शून्याखाली आला आहे. पिलानीमध्ये उणे 0.5 इतके तापमान नोंदविले गेले. फतेपूरमध्ये तापमान उणे 3 होते.
हवामान बदलामुळे विमान व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. धुके पसरल्याने विमान उड्डाणाला फटका बसला आहे. तर दुसरीकडे रेल्वे गाड्यांनाही फटका बसल्याने अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर 1 जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांत सतत होणारी बर्फवृष्टी आणि थंड वारे यांमुळे अवघा उत्तर भारत तीन दिवसांपासून पार गारठून गेला आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, मध्य प्रदेश, पंजाब या सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. हवामान विभागाकडून देशातील आठ राज्यात 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. काही भागांत पारा शून्याखाली गेला आहे. थंडीमुळे उत्तर प्रदेशमध्ये 68 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काश्मीरमध्येही थंडीचा कहर असून, श्रीनगरमधील दाल लेक गोठून गेला आहे. मध्य प्रदेश व पंजाबच्या काही भागांमध्ये तापमान 2 ते उणे 1 च्या दरम्यान आहे. अमृतसर व जालंधरमध्ये थंडीचा इतका कहर आहे की, रस्त्यांवर शुकशुकाट आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा तसेच ईशान्येकडील सिक्कीम तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांतही कडाक्याची थंडी जाणवत आहे. कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्रही गारठला आहे. उत्तराखंडमधील आठ शहरांमध्येही तापमान 2 अंशांखाली आहे. चमोलीमधील जोशीमठ आणि कुमाऊं च्या मुक्तेश्वर येथे ते शून्याखाली गेले आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा, मंडी, सोलन, सिरमौर व उना येथेही थंडीची लाट आहे.