नवी दिल्ली : हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. या वादळाचे नाव 'मोचा' असे असून तिथल्या राज्य सरकारांनी सावधानगता बाळगायला सुरूवात केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आशिया खंडातील यमन देशाने या वादळाला 'मोचा' हे नाव दिले आहे. खरं तर मोचा हे यमनमधील एका शहराचे नाव असून ते कॉफीच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या शहराला 'मोखा' असे देखील म्हणतात. शनिवारी आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पुढील आठवड्यात या भागांत चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ९ मे च्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे.
'मोचा' चक्रीवादळ हे यंदाच्या वर्षातील पहिलेच वादळ आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) या संभाव्य वादळाला 'सायक्लोन मोचा' असे नाव दिले आहे. या चक्रीवादळामुळे पुढील दोन ते तीन दिवस पश्चिम बंगाल आणि ओडिशा या रांज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD ग्लोबल फोरकास्ट सिस्टमने (GFS) दिलेल्या माहितीनुसार, मोचा हे वादळ १२ मे पर्यंत उत्तर, ईशान्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत प्रवास करेल.
ओडिशा सरकारची तयारी पूर्णओडिशा सरकारने १८ किनारपट्टी आणि जवळच्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना चक्रीवादळाचा अंदाज लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. शनिवारी आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
खरं तर असा देखील अंदाज वर्तवला जात आहे की, हे वादळ बांगलादेश, म्यानमारच्या दिशेने कूच करेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि शहरातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तसेच चेन्नईतही दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"