नवी दिल्ली : भारतातील हवामान खाते पुढील मान्सूनमध्ये मलेरियाच्या प्रकोपाचाही अंदाज वर्तविणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी शनिवारी ही माहिती दिली. भारतीय विज्ञान अकादमीने आयोजित केलेल्या हवामान व जलवायू पूर्वानुमानात झालेली प्रगती या विषयावरील संमेलनात बोलताना राजीवन म्हणाले की, उच्च दक्षता कम्प्युटिंग (एचपीसी) क्षमता सध्याच्या १० पेटा फ्लॉप्सपासून वाढवून ४० पेटाफ्लॉप्स करण्याची योजना आहे. यामुळे हवामान अंदाज वर्तविण्यात उल्लेखनीयरीत्या मदत मिळणार आहे. सध्या एचपीसीबाबत अमेरिका, ब्रिटन व जपाननंतर भारताचे स्थान आहे.
मागील आठवड्यात पृथ्वी विज्ञान खात्याने एक अहवाल जारी करून म्हटले होते की, राष्ट्रीय मान्सून मिशन व एचपीसीवर योग्य तो खर्च करण्यात आला आहे. त्यापासून मिळणारा लाभ ५० टक्के अधिक आहे. संमेलनानंतर राजीवन यांनी सांगितले की, व्हेक्टर जनित (डास आदीपासून फैलावणारे आजार) आजारांच्या प्रकोपाचा अंदाज वर्तविण्यासाठी आयएमडीने मलेरिया होण्याचा पावसाळ्याशी असलेला संबंध याबाबत अभ्यास केला आहे. आयएमडीने सर्वांत प्रथम नागपूरहून येणाऱ्या आकड्यांचा अभ्यास केला. तो इतर ठिकाणीही लागू होणार आहे. यामुळे मलेरियाचा अंदाज व्यापक प्रमाणावर लागू करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर डेंग्यू व इतर आजारांचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जाईल.
कुठे आढळतात सर्वाधिक रुग्ण?
आयएमडी पुढील वर्षाच्या मान्सूनमधील मलेरियाचा अंदाज वर्तविण्याची सेवा सुरू करणार आहे. विशेष म्हणजे जागतिक मलेरिया अहवाल-२०१९नुसार अफ्रिकेच्या उपसहारा भागातील १९ देश व भारतात जगभरातील ८५ टक्के मलेरियाचे रुग्ण आढळतात. राष्ट्रीय स्वास्थ्य पोर्टलनुसार, देशात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण पूर्व व मध्य भारतात, तसेच जंगल, पर्वत व आदिवासी भागांत आहेत. या राज्यांमध्ये ओडिशा, छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व पूर्वोत्तर राज्ये (त्रिपुरा, मेघालय व मिझोराम) यांचा समावेश आहे. २००१ मध्ये देशात मलेरियाचे २०.८ लाख रुग्ण आढळले होते, तर २०१८ मध्ये या रुग्णांची संख्या चार लाखांच्या जवळ होती.