नवी दिल्ली/मुंबई : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर तुषिता पटेल नावाच्या आणखी एका महिला पत्रकाराने मंगळवारी लैंगिक शोषणाचा आरोप केले. आतापर्यंत किमान १५ महिलांनी अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलांचा आवाज बंद करण्यासाठी अकबर यांनी न्यायालयात धाव घेताना ९७ वकिलांची फौज उभी केली असली तरी त्यांच्या अडचणीत वाढच होत चालली आहे.
अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाºया सर्व महिला पत्रकार असून, त्या विविध वर्तमानपत्रांतील आहेत. द एशियन एज, द टेलिग्राफ, डेक्कन क्रॉनिकल अशा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत त्यांनी कधी ना कधी अकबर यांच्या हाताखाली काम केले आहे. तुम्ही एखादी तक्रार खोटी आहे, म्हणू शकाल, पण १५ महिला असा आरोप करीत असतील, तर त्या सर्व जणी खोट्या आहेत, असे म्हणताच येणार नाही, असे एका निवृत्त न्यायाधीशाने सांगितले.
आता कदाचित या महिलांनी भाजपाला अडचणीत आणण्यासाठी अकबर यांच्याविरुद्ध आरोप केले, असे कोणी म्हणेल. पण यापैकी एकाही महिलेने भाजपाबद्दल अवाक्षरही काढलेले नाही. बहुतांशी महिलांनी अकबर यांनी कसा छळ केला, याचे वर्णनही केले आहे. त्यामुळे १0 वा १२ वर्षांनी आरोप सिद्ध होणे अशक्य असले तरी ते खोटे आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे या न्यायाधीशाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. शिवाय बहुतांशी महिलांनी स्वत:चे नावही उघड केले आहे. केवळ अकबर यांना बदनाम करण्याचा कट असता, तर त्यांनी ही हिंमत दाखवली नसती, असे ते म्हणाले.
चित्रपटसृष्टीत हे प्रकार व्हायचे, हे अनेकांना माहीत होते. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही लैंगिक छळ झाल्याची उदाहरणे आहेत. पण वृत्तपत्रांमध्ये वा एकूणच प्रसारमाध्यमांमध्ये असे होत असेल, हे आतापर्यंत कोणालाच खरे वाटत नव्हते. मीटूच्या निमित्ताने अकबर, साजिद खान, आलोकनाथ, टाटा मोटर्समधील बडा अधिकारी तसेच क्रिकेट कंट्रोल बोर्ड, स्पोटर््स अॅथॉरिटी येथील प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. त्या प्रकरणांत निकाल काय लागतो, हे महत्त्वाचे नसून, महिला आता र्लैगिक शोषण सहन करणार नाहीत, उघड झालेल्या प्रकारांमुळे जागरुकता निर्माण होईल आणि पुरुषही अशी हिंमत करणार नाहीत, असे या न्यायाधीशाने स्पष्ट केले.
या मोहिमेची बदनामी करण्याचे प्रयत्न विशिष्ट स्तरांतून, समाजमाध्यमांतून सुरू आहेत. ही बाब चिंतेची आहे. मीटू मोहिमेची टिंगल करणारे विनोद पसरवणे ही समस्त महिलांची बदनामी आहे, असेही ते म्हणाले.