नवी दिल्ली - परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. याप्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टात 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. एम. जे. अकबर यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात 15 ऑक्टोबरला अब्रुनुकसानी खटला दाखल केला होता. करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी अकबर यांनी आपली बाजू मांडली असून, त्यांनी संबंधितांवर दावाही दाखल केला आहे. याबाबत अकबर यांच्या वकिलांनी सांगितले की, अकबर यांच्या बाजूनं लढण्यास 97 वकिलांची फौज तयार आहे.
''लैंगिक शोषणाचे सारे आरोप पूर्णत: खोटे आहेत. खोट्या आरोपांना पाय नसतात मात्र त्याचे विष हमखास बाधते. बेजबाबदार आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे'', असा इशारा देत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी या प्रकरणात अखेर आपले हात झटकले.
(#MeToo आरोपांचे तथ्य तपासल्यानंतरच एम. जे. अकबर यांच्यावर कारवाई : अमित शहा)
पत्रकार प्रिया रमानींनी म्हटलं, 'सामना करण्यास मी तयार'पत्रकार प्रिया रमानी यांनी सोमवार (15 ऑक्टोबर) म्हटलं की, 'सत्यच माझा बचाव करणार आहे. एम. जे. अकबर यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याविरोधात सामना करण्यास मी तयार आहे. अकबर भीती दाखवून, धमकावून आणि लैंगिक शोषण करुन पीडितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत'.
काय आहे प्रकरण ?एम. जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुमा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली कधी ना कधी काम केले आहे. पुरुष आपल्या पदाचा अनेकदा गैरवापर करताना आढळतात. चित्रपटसृष्टीप्रमाणे माध्यमे, राजकारण आणि कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी असे करत असतात. आता महिला उघडपणे बोलू लागल्या असून, त्यांचे म्हणणे गांभीर्याने घ्यायलाच हवे, असंही केंद्रीय मंत्री मनेका गांधी म्हणाल्या आहेत.
या आहेत सात जणी :एम.जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुभा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या आहेत. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली काम केले आहे.