नवी दिल्लीः पत्रकार, संपादक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणाऱ्या एम जे अकबर यांना 'मीटू' प्रकरण चांगलंच भोवलंय. अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानं संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अकबर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. किंबहुना, पदावरून पायउतार होण्याचे आदेश त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गेल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळतं. मोदी सरकारच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात, आरोप झाल्यानं राजीनामा द्यावा लागलेले अकबर हे पहिलेच मंत्री आहेत.
पत्रकार प्रिया रमानी यांनी सर्वप्रथम एम जे अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर, आतापर्यंत 15 महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर शोषणाचे आरोप केलेत. हे आरोप झाले, तेव्हा अकबर परदेश दौऱ्यावर होते. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर, हा वैयक्तिक विषय असल्याचं सांगून भाजपानं सावध पवित्रा घेतला होता. रविवारी अकबर परदेश दौऱ्यावरून परतले. आपण राजीनामा देणार नाही, असं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं होतं. पण, ७२ तासांत सूत्रं हलली आणि अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणं भाग पडलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी मंगळवारी अकबर यांची भेट घेतली होती, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळीच त्यांनी मोदींचा आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका महिन्यावर येऊन ठेपल्यात. अशावेळी, अकबर यांच्यावरील आरोपांमुळे सोशल मीडियावरून भाजपावर होणारी टीका पक्षाला परवडणारी नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी हे ठोस पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.
एम जे अकबर हे मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेलेत. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होतेय. सोशल मीडियावर मंगळवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा स्त्री शक्ती या विषयावर मीडियाशी बोलत असतात आणि त्यांना अकबर यांच्याबाबतचा प्रश्न विचारताच ते निघून जातात, असा हा व्हिडीओ होता. त्यामुळे अकबर यांच्यावरील आरोपांचं प्रकरण आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं, याची जाणीव पक्षश्रेष्ठींना झाली. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नसल्याचं त्यांना पटलं आणि अकबर यांच्या गच्छंतीवर शिक्कामोर्तब झालं, असा घटनाक्रम सूत्रांनी सांगितला. भाजपा हा स्त्रियांचा सन्मान करणारा पक्ष आहे, हा संदेश या निमित्तानं मोदींनी दिला आहे.
दरम्यान, एम. जे. अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावरील सुनावणी गुरुवारपासून सुरू होतेय. रमानी यांच्या समर्थनार्थ 19 महिला पुढे आल्यात. या खटल्यात आपल्याला साक्ष देण्याची संधी दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 'रमानी या संघर्षात एकटी नाही. न्यायालयानं मानहानीच्या खटल्यात आमची साक्ष नोंदवावी. आमच्यातील काहीजणी लैंगिक अत्याचाराच्या साक्षीदार आहेत,' असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. यावर सर्व 19 महिलांची स्वाक्षरी आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये मीनल बघेल, मनीषा पांडे, तुषिता पटेल, कणिका गहलोत, सुपर्णा शर्मा, रमोला तलवार बादाम, होइहनु होजेल, आएशा खान, कुशलरानी गुलाब, कनीजा गजारी, मालविका बॅनर्जी, ए. टी. जयंती, हामिदा पार्कर, जोनाली बुरागोहेन, मीनाक्षी कुमार, सुजाता दत्ता सचदेवा, रेशमी चक्रवाती, किरण मनराल आणि संजरी चॅटर्जी यांचा समावेश आहे. याशिवाय डेक्कन क्रोनिकलच्या पत्रकार क्रिस्टिना फ्रान्सिस यांनीदेखील या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.