नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. #Metoo प्रकरणात एम.जे.अबकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेक महिला पत्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे, भारतात परत येताच अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवला आहे. मात्र, अद्याप हा राजीनामा स्विकारण्यात आला नाही.
#MeToo चळवळीदरम्यान आरोप झालेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर आज भारतात परतले आहे. विमानतळावरच पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यावेळी, आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत नंतर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राजीनामा देणार का, असे विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, अकबर यांनी राजीनामा दिल्याचे समजते. त्यांनी पतंप्रधान कार्यालयाकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा दिला असून पंतप्रधानांच्या सचिवांनी त्यांच्या राजीनाम्याची नोंद केल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, आतापर्यंत सात भारतीय व एक परदेशी अशा आठ महिला पत्रकारांनी एम. जे. अकबर यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. अकबर यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही दखल घेतली. अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल, असे अमित शहा यांनी शनिवारी स्पष्ट केले होते.