नवी दिल्ली : परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी ते वृत्तपत्राचे संपादक असताना आमचा लैंगिक छळ केला होता, असा आरोप किमान सहा महिला पत्रकारांनी केला आहे. अकबर सध्या व्यापार शिष्टमंडळासह नायजेरियाच्या भेटीवर असून, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना पाठवलेले ई-मेल्स, फोन, व्हॉटस्अॅप मेसेजेस्ला त्यांनी उत्तर दिलेले नाही.लैंगिक छळाचा आरोप झालेल्यांपैकी बहुतेक जण मनोरंजन, चित्रपट व प्रसारमाध्यमांतील असून, अकबर हे असा आरोप झालेले पहिलेच राजकीय नेते आहेत. लैंगिक छळाचा आरोप झाल्याचे गेल्या आठवड्यात समाजमाध्यमांतून पहिल्यांदा समोर आल्यानंतर भारतात ‘मी टू’ चळवळीने वेग घेतला.इंडिया टुडे, द इंडियन एक्स्प्रेस, मिंटच्या प्रिया रामाणी या माजी पत्रकार असून, त्यांनी पहिल्यांदा अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.‘व्होग इंडिया’ला गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये लिहिलेल्या लेखात रामाणी यांनी अकबर यांच्याबरोबर आलेला अनुभव सांगितला आहे. त्या लिहितात, तेव्हा संपादक असलेल्या अकबर यांनी मला दक्षिण मुंबईतील त्यांच्या हॉटेलच्या खोलीत नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले.मी तेव्हा २३, तर अकबर ४३ वर्षांचे होते. या हॉटेलमध्ये ते नेहमीच मुक्कामाला असायचे. रामाणी यांनी म्हटले की, ती मुलाखत कमी आणि डेट जास्त होती व तीत त्यांनी मला ड्रिंक देऊन जुनी हिंदी गीते गायली.मला अकबर यांनी त्यांच्या बेडवरही बसायला सांगितले. बेडवर बसायला फारच छोटी जागा असल्याचे सांगून रामाणी यांनी त्याला नकार दिला होता.
#MeToo : परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 6:13 AM